छैलसिंह गुरूजी
मुक्काम:सुराणा, जिला :जालोर.
स्टेट:राजस्थान
....................
प्रिय
गुरूजी तुमच काही चुकल नाही
तुमची मनाची घडणच झालीय तशी-
'जाती है के जाती नही !'
तुमच्या मनात साचलेली घाण
किती टन असेल
अंदाज च येत नाही.
ही घाण पूर्वीही अनुभवली
अगदी स्वातंत्र्याच्या
रौप्य महोत्सवी वर्षात
सुवर्ण महोत्सवी वर्षांत
आणि
आता आता ही
"अमृत" महोत्सवी वर्षात सुध्दा.
अलिकडे अलिकडे तर
म्हणजे 2014 पासून
आम्ही तर 'गुरूजी'पण
जास्तच अनुभवतो.
गुरूजी :
तुम्ही ज्या राजस्थान चे आहात
तेथील हायकोर्टाच्या दर्शनी भागातच
विषमतेचा पुरस्कर्ता, स्त्री द्वेष्टा
मनू चा पुतळा उभा केला आहेत
तुमच्या पूर्वजांनी,
आणि
ह्या धर्मनिरपेक्ष देशात
कोणाची हिम्मत ही
नाही झाली तो हटवण्याची.
मी पाहिला आहे तो पुतळा.
गुरूजी:
तुमचं राजस्थान ही मजेदार आहे
भंवरीदेवी पासून किंवा त्याही पूर्वीपासून
काय काय पचवते!
आणि याचे
उदात्तीकरण तर तुमचा स्थायी भाव !
गुरूजी:
तुम्ही हे असे पहिलेच नव्हे
फार फार पूर्वीची
एक प्रत्यक्ष अनुभवलेली गोष्ट सांगतो,
"तुमच्या राजस्थानात
जयपूर टोंक महामार्गावर
चाकसू नावाच गाव आहे.
तालुक्याच ठिकाण
आजपासून साडेतीन दशकापूर्वी
एक अंगणवाडी कार्यकर्ती
नियमित असूनही
तिला अंगणवाडी इमारतीत आत जाण्याचा
अधिकार नव्हता.
बिचारी बाहेर मुलापासून दूर बसलेली असायची
खाऊबिऊ मदतनीसच वाटप करायची.
आम्ही विचारल तिला,
आत येण्यासाठी बोलावलय
पण
बिचारी इतकी भेदरलेली,
विचारल तिला
मुक मुक होती
निःशब्द !
खोदून विचारल तरीही
तेव्हा सुध्दा
काहीच बोलली नाही.
मदतनीस मात्र
ठसक्यात बोलली-
'अछुत है ना साब !'
सोबत असलेल्या
साहेबीन ला विचारलय
हे कस ?
ती पूर्ण निरुत्तर.
तर गुरुजी:
तुमचा डीएनए च असा आहे.
"जाती है के जाती नही!"
बर
पाणी भरलेले मडके
कोणी बनवले
तसा तोही अछुतच.
पण
आम्हाला शोधायचा असतो
अस्सल 'अछुत'
आणि बदडून काढायचाच
असत त्याला.
आणि
गुरुजी:
अलिकडे
म्हणजे 2014 पासून
तर तुम्ही फारच माजलेले.
महात्मा गांधीचा
पुतळा करुन पुन्हा गोळ्या झाडता
ही विकृती जोपासणारे तुम्ही
आणि
नथुराम ला 'देशभक्त' ठरवणारे तुम्हीच.
आता आताच लाल किल्ल्यावरून
देशाचे प्रधान सेवक
गळा काढून
महिलाविषयी बोलले.
आणि काय आश्चर्य
त्याच दिवशी-
बिल्कीस बानोवर
बलात्कार करून सोबत
चवदा लोकांची कत्तल करुनही
सारेच कसे निर्दोष सोडण्याची
निर्लज्ज पणे शिफारस करतात
गुजराथेतील प्रशासन.
अशा वेळी
प्रधान सेवकाच मात्र सोईस्कर मौन .
ना लाज ना शरम!
गुरूजी:
अशा निर्लज्ज वर्तनाने
देशालाच लाज येवू लागली.
म्हणून छैलसिंह गुरूजी
तुमच काही चुकल नाही
बिचा-या छोट्या इंद्रकुमार मेघवालच चुकल .
कारण, छैलसिंह तुम्ही चुकूच शकत नाही
हा आत्मविश्वासच इंद्रकुमारचा खून करण्यास
तुम्हाला प्रवृत्त करतो.
जाता जाता: अलीकडच्या काळातच
मंदिरातील पाणी पिले म्हणून
असच लोकांनी एका मुलाला बदडूनच काढल होत .
छैलसिंह गुरूजी हे सहजच आठवल पाहा.
आणि काय काय आठवायच आम्ही!
अन तुम्हाला सांगून तरी काय फरक पडणार !
तुम्ही मुलखाचे बेशरम!
...............................
प्रभू राजगडकर, नागपूर
0 Comments