दादा तुम्ही वर्षभरापूर्वी यायला हवे होते!

दादा तुम्ही वर्षभरापूर्वी यायला हवे होते!




राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आताचे विरोधीपक्ष नेते अजीत पवार नुकतेच चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात पुर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी येवून गेले.

जातांना, पत्रकार परिषदेत, ठराविक राजकीय स्टेटमेंटही दिले.  मुंबईत बसून, मुख्यमंत्रीना जिल्ह्याची परिस्थितीचे गांभीर्य समजणार नाही, (महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेवर तर हा निशाना नसावा ना?) पुरग्रस्तांना हेक्टरी 75 हजार रूपये सरसकट द्यावे, पुरग्रस्तांना तातडीची मदत 5 हजारावरून 10 हजार करावी वगैरे ...वगैरे... !

दादा पुरग्रस्तांना भेटायला आले, पुरग्रस्तांची चंद्रपूर-गडचिरोलीत  भेट किती घेतली हे कळलं नाही, सावली मूल मार्गानेही गेले,  या भागातील बांद्यावर जावं असं त्यांना वाटलं नाही, मात्र चंद्रपूर शहरात खासदार धानोरकर यांचे कार्यालयातील भेटी आणि आमदार किशोर जोरगेवार यांचे घरील ‘अम्मा टिफीन’च्या बातम्याच हेडलाईनवर आल्यांने, दादाचा दौरा पुरग्रस्तांपेक्षाही राजकीय नेत्यांना दिलासा देणाराच ठरला.  असो..!

दादाच्या दौर्‍यांवर शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी खोचक टिप्पणी केली, दादा, वीस दिवसापूर्वी यायला हवे होते, तेव्हाच गंभीर परिस्थिती होती असे त्यांनी सांगीतले. खासदार तुमाने यांचे म्हणणे काही अंशी खरं आहे, 20 दिवसापूर्वी विदर्भाची, विषेशतः गडचिरोली आणि चंद्रपूरची परिस्थिती अतिशय गंभीर होती, मात्र दादा 20 दिवसापूर्वी ऐवजी एक वर्षांपूर्वीच आले असते तर?
तर, निश्चितच पूर्व विदर्भातील लाखो पुरग्रस्तांना न्याय मिळाला असता.  मागील वर्षी वैनगंगेला मानवनिर्मीत पुर आला.  तब्बल आठवडाभर हा पुर राहीला.  हजारो गरीबांचे घरे उध्वस्त झालीत, शेतीची नासाडी झाली, घरातील अन्न आणि शेतातील औजारे होत्याची नव्हती झाली. मुलांचे शालेय पुस्तकांची वाट लागली, गुरांचे गोठे नष्ट झाले, नहराच्या नहरे फुटली, लाखो लोकांचे करोडो रूपयाचे नुकसान झालेत, दादा, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मुंबईत बसून पूर्व विदर्भाचे दुःख तुम्हाला कळले तरी होते काय?

त्यावेळीही तुमच्या प्रशासनाने रडून-रडून लोकांना तातडीची मदत म्हणून कुणाला अडीच हजार तर कुणाला पाच हजार दिले.  दादा तुम्ही आले असते तर, या लाखो पुरग्रस्तांना 10-10 हजार मिळाले नसते काय? तुम्ही मुंबईत बसून, आदेश देत होतात, म्हणून येथील पुरग्रस्तांना हेक्टरी 10 हजार रूपये भरपायी मंजूर झाली, ती किती लोकांना मिळाली? हा प्रश्न असला तरीही तुम्ही तेव्हाच आले असते तर, येथल्या पुरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजाराची थेट मदत मिळाली नसती काय? दादा, तुमच्या न येण्यांने, पूर्व विदर्भातील लाखो जीवांचे कोट्यावधीचे नुकसान झाले ना? कदाचित त्यांचाच तळतळाट असेल म्हणून तर, आपली सत्ता गेली नसेल? काही असो, पण दादा, तुम्ही तेव्हाच उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्रीच्या भुमिकेत इथे यायला हवे होते, तुम्ही आले असते तर, आम्ही, तुम्हाला निश्चितच तुमचे विदर्भावरील ‘प्रेमापोटी’ दोन प्रश्न विचारलेच असते. 1. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूर्ण बाधीत घरांना 1 लाख 55 हजार आणि विदर्भातील पुरग्रस्तांच्या पूर्ण बांधीत घरांना केवळ 95 हजारच का? काय? आम्ही सवतीचे लेकरं आहोत कि, राष्ट्रवादीचे नावडते? 2. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील अंशतः पडलेल्या घरांना 50 हजार पर्यंत भरपायी, त्यांच्या गोठ्यांनाही भरपायी आणि विदर्भातील अंशतः पडलेल्या घरांना केवळ 6 हजार आणि गोठ्यांना ठेंगा! का? तुम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करता कि, केवळ काही भागाचे? प्रश्न तुमच्या दृष्टीने छोटा असला तरी, विदर्भातील लाखो पुरग्रस्तांच्या जिव्हाळ्याचा होता. पण दादा, तुम्ही त्यावेळी आलेच नाही ना!

दादा, तुम्ही त्यावेळी आले असते तर, तुम्हाला सगळीकडे पाणीच पाणी दिसले असते, त्या पाण्यांत, वाहणारी गरीबांची घरे दिसली असती, दिसली असती गरीबांची उघड्यावर पडलेली संसार!!  नजर टाकाल तीथे पडलेली घरे, आणि पावसात भिजलेली आणि कुजलेली धान्य सुकविण्यांचा प्रयत्न करणार्‍या बाया! रिकामे पडलेले गुरांचे गोठे आणि मच्छीमारांचे आयुष्याचे साधने हिरावल्यांने दुःखी झालेले चेहरेही तुम्हाला दिसले असते.  पुस्तक आणि दप्तर पाण्यांत वाहून गेल्यांने, शिक्षणासाठी आसुसलेली आणि उदास झालेल्या बालकांचे चेहरे पाहून तुम्ही कितीही कठोर मनाचे असले तरी गलबललेच असते, नाही काय?

तुम्ही वर्षभरापूर्वी थोंड मुंबईचा मोह टाळून, ब्रम्हपुरी पर्यंत आलेच असते तर, विदर्भ-कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा भेदभाव का करता? पुरग्रस्तांना घरासाठी मदत का देत नाही?  यावरून श्रमिक एल्गारला मोर्चा काढण्यांची गरज तरी राहीली असती काय? विदर्भातील गरीब आणि खचलेल्या पुरग्रस्तांना न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपिठात याचिका दाखल करावी लागली असती काय?  खरंच दादा, तेव्हा तुम्ही इथे यायला हवे होते, आले असतेच तर आमदाराच्या अम्माची टिफीन नाही परंतु पुरग्रस्तांच्या कन्या-आंबलीची न्याहारी तुम्हाला मिळालीच असती!  आले असतेच तर, तुमच्या घड्याळीचे काटेही जरा सरकले असते.

ता.क. - चंद्रपूर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले असताना, त्यावेळी आपले मोठे साहेब महाविकास आघाडीचे निर्माते, आदरणीय शरदचंद्रजी पवार आले होते. मूल तालुका क्रीडा संकुलात त्यांचं भाषणही झाले. मात्र त्यांनीही त्यावेळी अवकाळीग्रस्ताविषयी अवाक्षरही काढला  नाही किंवा हाकेच्या अंतरावर असलेल्या बांधावरही ते गेले नाही.  याला राष्ट्रवादीचा विदर्भातील शेतकऱ्याप्रती जिव्हाळा समजाव काय?

विजय सिध्दावार, मूल
9422910167

Post a Comment

0 Comments

Write for The Vidarbha Gazette!