विस्थापन 
विस्थापन फारच वेदनादायी असत.या विषयावर जाॅन स्टाईन बेक ची "द ग्रेप्स ऑफ राॅथ" कादंबरी असल्याचे माहिती आहे.अलिकडेच ती मराठी मध्ये सुध्दा उपलब्ध झाली. मराठीमध्ये या विषयावर कथा ,कादंबरी असेलही.अनेक लोक या विषयावर काम करतात. विस्थापनाचा पहिला बळी राहीले आहेत आदिवासी.* "एका अंदाजानुसार, भारतामध्ये जलसंधारण प्रकल्प, खाणकाम, औष्णिक विद्युत प्रकल्प, अभयारण्य, उद्योग धंदे इत्यादि मुळे १९५० ते १९९० या काळात सुमारे २कोटी १३लाख लोक विस्थापित झाले.यापैकी ८५ टक्के आदिवासी होते.त्यांची जमीन आणि राहण्याची जागा सरकारने आणि खाजगी उद्योगांनी तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन हस्तगत केली. आदिवासी नेहमीच जबरदस्तीने केल्या जाणा-या विस्थापित विरुध्द आंदोलन केले" (भारतातील सामाजिक चळवळी:घनश्याम शाह.अनुवादित सेज पब्लिकेशन).
"आजच्या घडीला देशात एकूण ८७०संरक्षित क्षेत्रे आहेत. त्यात १०६ राष्ट्रीय उद्याने, ५औत अभयारण्ये, ९९संरक्षित क्षेत्रे, २१८सामुदायिक संरक्षित क्षेत्रे व ५२व्याघ्र प्रकल्प आहेत. यात राहणा-या आदिवासी व गैरआदिवासींची लोकसंख्या आहे.४३ लाख.वनाधिकार कायदा येऊन २५ वर्षे झाली, तरी त्यांच्यावर विस्थापनाची टांगती तलवार कायम आहे"(आदिवासींच्या सहजीवनाला हरताळ: देवेंद्र गावंडे, लोकसत्ता दि ३०|४|२०२२.
अशी ही विस्थापनाची विक्राळ समस्या अद्यापही सुटत नाही.उलट यामध्ये दडपशाहीच अधिक आहे.अलिकडेच मलकानगिरी जिल्ह्यात जाऊन आलो.एका धरणामुळे सर्वस्व गेलेल्या लोकांचा संघर्ष अनुभवून आलो. त्याविषयी नंतर कधीतरी.
पण आज एक मे जागतिक कामगार दिनानिमित्त याच मे महिन्यात, अशाच तळपत्या सूर्याची पर्वा न करता जिवती (चंद्रपूर) तालुक्यातील कोलामांनी दिडशे कि.मी. चा पायी प्रवास करून उध्वस्त  केल्या गेलेल्या वस्ती बाबत न्याय मागण्यासाठी फाॅरेस्ट विभागाच्या कार्यालयावर मोर्चा आणला होता. आठ - दहा वर्षांपूर्वी. तीन दिवस ते सर्व कोलाम चंद्रपूरातील नागपूर रोडवरील फाॅरेस्ट कार्यालयासमोर ठिय्या देवून होते.गंमत म्हणजे याच रस्त्यावर जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईओ यांचेही बंगले आहेत. पण यापैकी कोणालाही आपण का आलात असे  विचारण्याचे साधे सौजन्य सुध्दा दाखवता आले नाही.हा  कोलामांचा एल्गार 'श्रमिक एल्गार' पुकारला होता.मी या फाॅरेस्ट कार्यालयाच्या जवळच सरकारी निवासामध्ये राहत होतो.या तीन दिवसात मी एकदा सहज भेट दिली. आंदोलन कर्त्या कोलामांशी बोललो. श्रमिक एल्गार च्या पारोमिता, विजय सिध्दावार यांची भेट घेतली.त्यांचेशी चर्चा केली. मी सरकारी अधिकारी असल्याने नैतिक पाठिंब्याशिवाय काही करू शकत नव्हतो. पण एक दिवस कोलामांची जेवणाची व्यवस्था होईल एवढी मदत मात्र केली. तीन चार दिवसांनी या कोलामांना,त्यांच्या आंदोलनाला निष्ठूर प्रशासनाने बिलकूल दाद दिली नाही.मग शेवटच्या दिवशी सर्व कोलाम प्रशासनाच्या या असहकार वृत्तीवर अक्षरशः थूकून आपल्या गावाकडे रवाना झाले.पुढे काहीतरी कार्यवाही झाली. पण या घटनेने माझ्यातल्या कवीला हादरवून सोडले. 
तेव्हा मी "उंदीआम भौ उंदीआम..." ही कविता लिहिली.
मुख्य वन संरक्षक, चंद्रपूर यांचे ऑफिस बाहेर आंदोलन
उंदीआम भौ उंदीआम
----------------------------
कुप नंबर अमुक अमुक 
कुप नंबर तमुक तमुक 
काय बाबा,
जिमिनीवर लिवल अस्त !
आमास्नी काय 
लिवता की वाचता येत 
आमी तसे अडानचोट 
अक्सराशी दुस्मनी
आमचच चुकल रे बाबा ! 
आमास्नी फकस्त ठाव 
राव्हासाठी घर 
अन
घरासाठी जिमिन लाग्ते
बांदाले लाग्ते लाकूड फाटा 
नोको तुमचा सिमिट इटा दगड गोटी 
म्हून तर आमी बांदल घर लाकूडफाट्याच
चिल्ले पिल्ले घिऊन राहू लाग्लो
कंदमुर मिरते थे खाऊ लाग्लो
फुढारी या चे मत्त मागाले 
त्याइनच नाम नोंदाले सांगतल
थ तवापासून देतो मत चिरीमिरी घेऊन.
बेस झाल मनत 
घाटा आंबील खाऊन जगू लाग्लो
ठाऊक नाय किती वर्सापासून राह्यतो येथ 
पोर झाली, पोराची पोरही झाली 
आन एक  दिस 
आली  फलटन 
चढवल जेसीबी का फेसीबी घरावर 
पोट्टे लागले बोंबलाले 
तस्स्या बाया लाग्ल्या सिवा द्याले
पन कोनी आयकल ते सरकारी नोकर कस्से
सप्पासप्पा साप केल घर -बि-हाड 
चारपाच महिन्याचे पोट्टे पडली बेवार 
गरवार बाया पोटाले धरून लाग्ल्या फिरू. 
काय सांगू भौ 
"कोलाम"न आमी 
कोन इचारते आमाले!
.......
कोलामः
कोलीत 
लावू 
मनू आत्ता. 
.....
सांग बये 
सांग भौ 
सांग बापू 
आमच्या कोलामाईच का चुकल 
पिरमिटव का फिरमिटीव टराईब 
मनतात मने!
आन मने 
बाबासाहेब च्या घटनेत 
आमाले हाये सौरक्सन
४६व्या कलमात का फलमात. 
........
हे फकस्त सांगाले हाहे का जी !
......   
पन काई मना तुमी 
आली एक बाई गोसाई 
मनाली आमाले  चाला 
त निंगालो आमी पैदल 
चिल्ल्या पिल्ल्या घिऊन 
कडीवर, खांद्यावर 
........
आले फोड पायाले 
उपासी तापासी 
गोसाई बाई होती संग.
मत मांगनारे आता गेल्ले कोठ 
दिसत नाई इकड तिकडं 
तीन दिस ठान मांडून बसलो 
उनामंदी-
पोट्टे पल्ली बिमार. 
न्यावाच काही दिसे नाही
'घर पाडल - बरोबर केल'
त्याईच मन्न पडल. 
...  ..
 वाटल होत बाप्पा 
पालक म्हून येईल जिलाधिकारी 
पन त्याईले मने येरच नाई 
व्हते मने लई बीजी 
फाॅरेस्ट वाल्याईन थं
खाकाच वर केल्या. 
......
हौसे नवसे गवसे 
दिऊ लागले सपोट 
अस आल मनी पेपरात
त्याईची बी "किव" येती. 
.....
मंग आमी सर्व्याइन 
थूकलो त्याईच्या नावान 
पुना थेतच घर बांधाच्या निर्धारान
निंगालो गावाकडे...      
सारा कोलाम की जय 
सारा आदिवासी की जय 
सारा आदिवासी उंदीआम !
प्रभू  राजगडकर. नागपूर
('श्रमिक एल्गार' च्या सहकार्यमुळे बगुळवाही येथील आदिवासी बांधव आजही त्याच गावात राहतात. तरी माणूस म्हणून जगण्यासाठी,  अनेक समस्यांवर मात करण्यासाठी  त्यांचा संघर्ष सुरूच आहे - संपादक)


 
 Posts
Posts
 
 
 
0 Comments