घोळ शिक्षक भरतीचा
शिक्षक-गुरुजी-मास्तर या तीन अक्षरी शब्दाला दोन दशकापूर्वी अतिशय मानमरातब लाभलेला होता. चौथी पास, सातवी पास, दहावी पास गुरुजींचा शब्द गावागावांमध्ये प्रमाणित मानल्या जायचा. गुरुजीला जगातल्या सर्वच गोष्टी येतात असंच मानल्या जायचं. व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडी कादंबरीतील राजाराम विठ्ठल सौंदणीकर गुरुजी साऱ्यांनाच त्यामुळे आठवतात. पुढे पुढे बारावी पास सोबतच डी. एड. पास उमेदवार शिक्षक हवा असायचा. त्यावेळी डी. एड. ला नंबर लागला पाहिजे म्हणून विद्यार्थी इयत्ता बारावीला रात्रंदिवस अभ्यास करायचे कारण डी. एड. ला नंबर लागणे म्हणजे हमखास गुरुजी होणे हे समीकरण ठरलेले होते. कला शाखेत 75 प्रतिशत गुण किंवा त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा नंबर डी. एड. ला लागायचा.
2009-10 मध्ये महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीसाठी केंद्राच्या धर्तीवरती CET घेण्याचे ठरविले. 2009-10 मध्ये त्याप्रमाणे बारावी पास डी. एड. धारकांसाठी पहिली CET झाली आणि शिक्षक भरती होऊन विद्यार्थी गुरुजी झाले. त्यानंतर तब्बल दहा वर्षे शिक्षक भरतीच झाली नाही; पण या काळात विद्यार्थी डी. एड., बी.एड. मात्र करत राहिले. पुढे पुढे डी. एड., बी.एड करण्यामध्ये विद्यार्थ्यांचा कल ओसरू देखील लागला. पण आजही अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमकडे वळताना दिसून येतात.
2014मध्ये डी.एड., बी. एड धारकांसाठी CET निघाली. त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख एकाच ठिकाणी फॉम भरण्याची सुविधा करण्यात आली होती. चंद्रपूरमध्ये जुब्लि हायस्कुल जवळील जिल्हा शिक्षक केंद्रावरती हा सेंटर होता. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी सकाळी चार वाजेपासून लाईनमध्ये उभे राहून फॉर्म भरत. फॉर्म भरायला एकच खिडकी असल्याने प्रचंड गर्दी व्हायची त्यामुळे विद्यार्थ्यांनी भयंकर गोंधळ केला, तर प्रशासनाने खिडकी वाढविण्या ऐवजी बंदुका घेऊन पोलीस पाठवले. हतबल विद्यार्थी काहीच करू शकले नाही. पुढे ही CET परीक्षा झाली. मात्र शिक्षक भरती झाली नाही. CET उत्तीर्ण सर्टिफिकेट पुढील सात वर्षे व्हॅलीड राहील या बेसवरती विद्यार्थ्यांना शांत करण्यात आले आणि शिक्षक भरतीचे स्वप्न उरात घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत राहिले.
2017 मध्ये परत पहिली टेट परीक्षा झाली. पवित्र पोर्टल पद्धत निघाली. ही परीक्षा होऊनसुद्धा शिक्षक भरती मात्र होत नव्हती. पात्रता धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक भरती व्हावी म्हणून मग निवेदन, मोर्चे सुरू केले आणि सरतेशेवटी 2019मध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काही शिक्षकांची तब्बल दहा वर्षांनी शिक्षक भरती झाली. या भरती प्रक्रियेला सुद्धा तीन वर्ष लागले.
2021 मध्ये परत शिक्षक भरतीसाठी TET परीक्षा निघाली ही परीक्षा डी. एड., बी.एड. पदवी धरकांसोबतच पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी सुद्धा देऊ शकत होते.
आता प्रश्न असा निर्माण होतो की भरती घ्यावयाची नाही आणि केवळ परीक्षाच घ्यायची हे कधीपर्यंत चालणार. 2009-10पासून शिक्षक भरतीसाठी पत्रता परीक्षा घेण्यात आल्या मात्र बोटावर मोजता येईल एवढेच पद भरण्यात आले. एखाद्या विभागाची दहा-दहा वर्षं भरतीचा न घेणे आणि केवळ पात्रता परीक्षाच घेणे कितपत योग्य आहे. या परीक्षा लाखोंच्या घरात विद्यार्थी देतात. यामाध्यमातून शासनाला कोटींच्या घरात महसूल मिळतो. केवळ महसूल प्राप्त करण्यासाठी या परीक्षा का? शिवाय शिक्षक व्हायचं या उद्देशापोटी पात्र पदव्या प्राप्त करून गेली दहा वर्ष ज्यांनी वाट पाहिली त्यांच्या स्वप्नांचे काय? उदरनिर्वाहाचे काय? तेव्हाच बावीशीतील विद्यार्थी आज बत्तीशीमध्ये आलाय. त्याच लग्नाचे व एकूणच त्याच्या भविष्याचे काय?
स्पर्धा परीक्षेत अगदी फार पूर्वीपासूनच भ्रष्ट्राचाराच्या माध्यमातून जागा भरल्या जात आहेत. पुण्यात असे कितीदातरी अनेक व्यक्तींना पेपर फोडताना पकडण्यात आले आहे. अगदी उपजिल्हाधिकारी पदापासून सारेच पद या माध्यमातून भरल्या गेले. यासाठी चाळीस-चाळीस कोटी रुपये एकेका पदासाठी श्रीमंत उमेदवारांनी भरून या नोकऱ्या मिळवल्या देखील आहेत. आज घडीला शासनाचा कोणताही विभाग असा नाही की जो भ्रष्टाचाराच्या माध्यमातून पद भरती करीत नाही. अगदी आर्मी भरतीत सुद्धा भ्रष्टाचार होतो.
2021 मध्ये घेण्यात आलेली TET बाबद आता दररोजच नवे नवे भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस येत आहेत. या विभागाच्या अध्यक्षानेच दस्तुरखुद्द पेपर फोडला. त्यामुळे या प्रक्रियेत कितीतरी खालच्या दर्जाचे अधिकारीसुद्धा गुंतलेले आहेत. त्यातल्या त्यात एकदोन विद्यार्थ्यांना नाही तर हजारो विद्यार्थ्यांना हे पेपर विकून कोटींच्या घरात पैशांची उलाढाल केल्या गेली. आता या घोटाळ्यात मंत्रालयातील सचिव देखील सहभागी असल्याचे समोर आले.
एकीकडे शेतमजूर, मजूर, कष्टकरी स्त्रिया, विधवा, परितक्त्या, पडेल ती काम करून पोट भरायचं आणि त्याच पैश्यातून मुलांचं शिक्षण करीत असताना कितीदातरी उपासमार भोगून जगायचं. नोकरीच्या आशेने मुलांना शिक्षण द्यायचं आणि ज्यांच्याकडे भरभक्कम पैसा आहे त्यांच्या 'ढ' मुलांकरिता असे अधिकारी पेपर विकून पैसा कमावतात. UPSC परीक्षा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा ठीक ठिकाणी सत्कार होतो. तो समाजासाठी आदर्श म्हणून पुढे येतो. समाजही त्याच्या गुणग्राहकतेचे कौतुक करतो आणि पुढे हा अधिकारी खोऱ्याने असा भ्रष्टचाराच्या माध्यमातून पैसा कमावतो.
आपल्या देशात कायमच बेरोजगारीने थैमान घातले आहे. कुणाचेही शासन असो बेरोजगरीवरती कायमचा तोडगा कोणत्याही शासनकर्त्याला काढता आलेला नाही आहे. आज घडीला बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. देशात 2018 ते 2020 यादरम्यान 9 हजार 140 बेरोजगारांनी आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या काळात 2020 मध्ये सर्वाधिक 3 हजार 548 इतक्या बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता रोजगार विभागामध्ये नोंदणीकृत उमेदवारांची संख्या 1 लाख 35 हजारांच्या वरती आहे. तर नोंदणी न केलेले उमेदवार लाखोंच्या घरात आहेत. राष्ट्र उभारणीसाठी तरुणाईच्या हाती काम असणे आवश्यक आहे. हाती काम असेल तर देश उभा होतो अन्यथा हाच देश गुन्हेगारीयुक्त हात निर्माण करून रसातळाला जाईल यात शंका नाही. त्यामुळे देशामध्ये आणखी समस्यांची भर पडू नये असे वाटत असल्यास अधिकाधिक रोजगाराच्या संधी धोरणकर्त्यांनी निर्माण करायला हव्यात आणि नोकरभरती मध्ये भ्रष्टाचार कर्त्यांना कठोर शासन व्हायला हवे. भारत देश हा सहा लाखांच्यावरती खेड्यापाड्यांमध्ये विभागला गेला आहे. या खेड्यापाड्यांमधील असंख्य गोरगरिबांच्या लेकरं नोकरी मिळेल किंवा कोणतेही काम हाताला मिळेल या आशेने रात्रंदिवस अभ्यास करीत आहेत. 18-18 तास ग्रंथालयामध्ये अभ्यास करीत आहेत. त्यामुळे राबत्या प्रत्येक हाताला काम मिळणे गरजेचे आणि त्यांच्या संवैधानिक हक्काचे आहे.
श्रीकांत साव
चंद्रपूर
8208705620
0 Comments