संतांची लक्षणे उद्धृत करणारे
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे स्मरण
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
वर्ष २००० मध्ये मी चंद्रपूर जिल्ह्यात नवीनच होते आणि रोज नवीन गोष्टी शिकत होते. ग्रामस्थांना संध्याकाळी वेळ असायचा त्यामुळे श्रमिक एल्गारच्या बैठका संध्याकाळी उशीरा सुरु व्हायच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी संपायच्या. एकदा चिटकीला मोठी बैठक होती आणि जवळपासच्या गावातील ग्रामस्थही आले होते. रात्रीच्या जेवणानंतर मला असे दिसले की ग्रामस्थ एका शेकोटीभोवती जमा झाले आहेत आणि ते हार्मोनियम व ढोलकी वजवण्यास सुरुवात करणार होते. लगेच त्यांनी भजनाला सुरुवात केली. एक व्यक्ती दोन ओळी म्हणत असे आणि मग इतर लोक तालावर टाळ्या वाजवत त्याच्या सुरात आवाज मिळसत. सुरुवातीला काही भजने मराठीत होती आणि मग हिंदीतील भजन ऐकून मला आश्चर्यच वाटले.
अब तो साधनही बदलना होगा, घर घर यही गाना होगा
एक जमाना था जप-तप का, सुंदर यज्ञ तिर्थ का
अब तो जमीन दे गरीबों को, घर घर यही गाना होगा
तुकड्यादास कहे यही होगा, होकर ही रहेगा
उल्टी चाल चले गर कोई, पागल ही कहलाना होगा
घर घर यही गाना होगा।
त्या दिवसापर्यंत भजन म्हणजे देवाची आणि संतांची स्तुती अशीच माझी समजुत होती पण हे काहीतरी फार वेगळे होते. आध्यात्मिकता प्राप्त करण्याचे आपले मार्ग बदलावे लागतील असे या भजनात म्हटले होते. प्रार्थना आणि जपमाळ, यज्ञ आणि तीर्थयात्रेला जाणे हे यापुढे आध्यात्मिक प्रगतीची खात्री देऊ शकत नाही. त्या पद्धती कालबाह्य झाल्या आहेत. गरीबांना जमीनीची पुनर्वाटणी करणे हा नवीन मार्ग आहे – हे आध्यात्मिकतेचे नवीन गाणे प्रत्येक घरात गायले जावे. तुकड्यादास, या भजनाचा रचनाकार, इशारा देतो आहे की जो गरीबांना करायच्या या पुनर्वाटणीला जो विरोध करेल त्याला वेडा घोषित केले जाईल!
जमीन सुधारणांचे समर्थन करणाऱ्या भजनाने मी भारावले आणि कवीबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते असे मला सांगण्यात आले, त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे चंद्रपूर जिल्ह्यात घालवली आणि आपल्या भजन व कीर्तनातून लोकांना प्रेरणा दिली.
भूदान चळवळीच्या काळात आचार्य विनोबा भावेंसमवेत तुकडोजी महाराज
अमरावती जिल्ह्यातील यावली या लहान गावात, अतिशय गरीब कुटुंबात महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण कसेबसे झाले. फार कमी वयातच ते सर्वसंगपरित्यागाकडे ओढले गेले. त्यांनी अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंदोळा आणि ताडोबाच्या जंगलात ध्यान केले. लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी सप्ताह आणि चातुर्मास यासारख्या सांस्कृतिक संसाधनांचा वापर केला. ते जनसमुदयाशी भाषणांद्वारे आणि त्यापेक्षा प्रभावीपणे खंजिरीच्या तालावर भजन गात संवाद साधत.
ग्रामगीता
१९५४ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण भागातील लोकांना आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन करण्यासाठी संपूर्णपणे श्लोकात, सोप्या मराठी भाषेत लिहिलेले अतिशय मोठे व महत्त्वाचे काम पूर्ण केले – ग्रामगीता. ग्रामगीतेत सामाजिक कर्तव्ये, समाजाचे संघटन, आदर्श गावे, शिक्षणाचे महत्त्व आणि एकूणच एक आदर्श मानवी जीवन जगणे अशा विविध विषयांचा समावेश आहे. तुकडोजी महाराजांनी शेतकर्यांना हे पुस्तक समर्पित केले आहे आणि इतर कुठल्याहीपेक्षा इथे आपल्याला त्यांची ग्रामीण शेतकरी समुदायाविषयीची सखोल सहानुभूती दिसते.
सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र-परत्रादी द्यावे.
कष्ट करोनी महाल बांधसी, परि झोपडीही नाही नेटकीचीशी
स्वातंत्र्याकरीता उडी घेशी, मजा भोगती इतरेची.
तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो
मानवतेचे तेज झळाळो, विश्वामाजी या योगे.
म्हणोनी तुजसी करतो अर्पण, तू विश्वाचे अधिष्ठान
तुझेची व्हावे आधी उत्थान, विश्वामाजी म्हणोनिया...
ग्रामगीता काळाच्या पुढची होती कारण त्याद्वारे तर्कशुद्ध मानसिकता, मुलांचे शिक्षण, विशेषतः मुलींचे शिक्षण, श्रमदानाचे महत्त्व आणि स्वयंपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित करण्याचा प्रसार-प्रचार केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गावांमध्ये आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये आजही ग्रामगीता वाचली जाते. ग्रामगीतेत नमूद मूल्ये आणि कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेले श्री गुरुदेव सेवामंडळ आजही कार्यरत आहे.
तुकडोजी महाराजांविषयी मला त्यांच्या लिखाणातून आणि पुस्तकांतून कळले, पण त्याहीपेक्षा जास्त त्या ग्रामस्थांकडून ज्यांच्यासाठी त्यांचे आजही जिवंत अस्तित्व आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये आजही अशी घरे आहेत जी अभिमानाने सांगतात, “महाराज आमच्या घरी यायचे. ते यायचे तेव्हा आमच्या आजीच्या हातची भाकरी खायचे.” तुकडोजी महाराजांच्या शब्दांशी ग्रामीण समुदायाची तार लगेच जुळते. उदा. महाराजांचे पुढील शब्द ऐकले की लोक आजही एकत्र येण्यास लगेच तयार होतात:
ऐसे ज्यांना आवडे सेवा, जे सत्याचा जपती ठेवा
त्या लोकांच्या करुणा मेळावे, सक्रिय संघठन वाढवावे
हत्तीस आवरे गवती दोर, मुग्यांही सर्पाशी करीती जर्जर
व्याघ्र सिंहास फाडती हुशा, रानकुत्रे संघटोनी
नागपुरात गांधी तलाव बांधण्यासाठी महाराजांनी श्रमदान केले
महात्मा गांधींचा प्रभाव
ग्रामस्वच्छता, ग्राम स्वराज्य, श्रमदान, व्यसनमुक्ती, आणि अस्पृश्यता निर्मूलन या गांधींच्या आदर्शांचा ग्रामगीतेवर गहिरा प्रभाव आहे. ग्रामगीतेतील “भू वैकुंठ” शीर्षक असलेले प्रकरण ३९ महात्मा गांधींना समर्पित आहे.
ग्रामराज्यची रामराज्य, स्वावलंबन हेची स्वराज्य
बोलीले महात्मा विश्वपूज्य, विकास त्याचा सुंदर हा
“ग्रामस्वराज्य हेच खरे रामराज्य आहे. स्वालंबन हे खरे स्वराज्य आहे. आदरणीय महात्मा गांधींनी ग्रामविकासाच्या सौंदर्याचे असे वर्णन केले आहे.”
१९४२च्या चले जाव आंदोलनाला प्रतिसाद देणार्या पहिल्या काहींपैकी तुकडोजी महाराज होते. त्यांच्या प्रसिद्ध भजनाने त्यांनी चिमूरमध्ये ग्रामस्थांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध एकत्र केले.
झाड झाडूले, भक्त बनेगी सेना
पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे
त्यांच्या शब्दांनी चिमूर आणि आष्टी येथे वसाहतवादी राजवटीविरुद्ध मोठा उठाव झाला आणि तुकडोजी महाराजांना अनेक महिने मध्य भारतातील विविध तुरुंगात ठेवण्यात आले.
महात्मा गांधींची ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी तुकडोजी महाराज मोझरी (अमरावती) आश्रमात होते. त्यांची लगेच दिल्लीला जाण्याची इच्छा होती पण देशभरात वाढत जाणारा तणाव पाहून लोकांनी त्यांना थांबवले. त्यांनी नागपूर येथे आणि नंतर अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभेला संबोधले. नागपूरातील लेंढी तलावाचे तुकडोजी महाराजांनी स्वतः श्रमदान करुन आणि आपल्या भक्तांसमवेत तो स्वच्छ करुन त्याचे पुनरुज्जीवन केले. नंतर त्यांनी त्या तलावाचे नामकरण 'गांधी तलाव' असे केले.
आज काही स्वयंघोषित साधू आणि महाराज आहेत जे गांधीजींना भेटलेही नाहीत परंतु त्यांच्या विरोधात द्वेष पसरवत आहेत. मात्र राष्ट्रसंत प्रत्यक्षात गांधीजींना भेटले आणि बराच काळ त्यांच्या सोबत सेवाग्राम आश्रमात राहिले. गांधीजींची स्तुती करणारी ११२ भजने त्यांनी लिहिली आणि त्यांचे आदर्श ‘गांधी गीतांजली’ या पुस्ताकात प्रकाशित केले.
विश्व हिंदू परिषेदेच्या स्थापनासमयी महाराज
संतांची लक्षणें
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, वेदांत परिषद, विश्व हिंदू परिषद आणि भारत साधूसमाज संघटन अशा हिंदू धार्मिक संघटनांशी जवळचा संबंध होता परंतु त्यांनी धर्माच्या कट्टर, मूलतत्त्ववादी रुपापेक्षा मानवता, सेवा आणि आध्यात्माचा प्रचार केला.
मनी नाही भाव,
म्हणे देवा मला पाव,
देव अशानं भेटायचा नाही रे,
देव बाजारचा भाजीपाला नाही रे.
“ज्यांच्या अंत:करणात माणुसकी नाही ते देवाच्या शोधात फिरत असतात. अशा लोकांना देव कधीच सापडणार नाही, कारण देव भाजीबाजारात मिळणारा नाही."
त्यांच्या आश्रमाच्या दारावर मोठ्या अक्षरात लिहिले आहे: सबके लिए खुला है, "मंदिर ये हमारा / आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी." आमचे मंदिर सगळ्यांसाठी खुले आहे. कोणत्याही पंथातील, कोणत्याही धर्मातील लोकांनी यावे.
गुरूकुंज मोझरी येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सोबत महाराज
ग्रामगीतेमध्ये खोट्या साधू-संतांना कसे ओळखावे याबद्दल विस्तृत स्वरूपात लिहला आहे ज्यामध्ये राष्ट्रसंत भक्ताला खऱ्या संताच्या पुढील लक्षणांकडे लक्ष देण्यासाठी मार्गदर्शन करतात. ज्यांच्यामध्ये खालील लक्षणं नाही त्यांना लगेच खोटे म्हणून ओळखावं:
संत गंगेहुनी पवित्र, शीतल, निर्मल, सूर्य-चंद्र
संत कल्पतरुहुनी थोर, मोक्षदायी
संत हृदये असती कोवळे, दया द्रवोनी हृदय उफाळे
मनुष्य कल्याणाची निर्वळे, संतांपाशी
संतांपाशी एकची धर्म, सकल जीवांचे कल्याण कर्म
मानवता हेची मुख्य वर्म, सर्वकाळ
संतास नाही जात-परजात, विश्वकुटुंब संताचे गोत
जेजे भेटतील ते आप्त, सुहृद त्यांचे.
“संत गंगेपेक्षा शुद्ध, चंद्रापेक्षा शीतल, सूर्यासरखे तेजस्वी असतात. संत, आध्यात्मिक मार्गदर्शन करतान कल्पतरूपेक्षा उदार असतात. संतांचे हृदय कोमल आणि प्रेमळ-दयाळू असते. संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याची त्यांची इच्छा असते. संत फक्त एकाच धर्माचे पालन करतात, सगळीकडे सतत मानवजातीच्या कल्याणासाठी झटणे. संताला कोणती जात, पोटजात नसते. सारे विश्वच त्यांचे कुटुंब असते. जे लोक त्यांना भेटतात ते सारे त्यांना नातेवाईकांइतकेच प्रिय असतात.”
वरील व्याख्येनुसार आपण खात्री बाळगू शकतो की जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आज हयात असते तर त्यांनी एका झटक्यात खोट्या धर्मसंसदा उद्ध्वस्त करून खोट्या साधूंचा - जे संत केवळ गांधींजींना शिव्या देतात असे नाही तर देशात नरसंहार आणि हिंसाचार पुकारत आहेत – त्यांचा पर्दाफाश केला असता.
- पारोमिता गोस्वामी
- भाषांतर वृषाली देशपांडे
मूळ लेख इथे वाचा : ‘Markers of False Sants’
1 Comments
मराठीत भाषांतर केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत खरे साधुसंत कसे ओळखावे हया बद्द्ल चे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आणि त्यांच्या विचारांची प्रासंगिकता लोकांच्या लक्षात येईल.
ReplyDelete