नारायणपूर येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहे.एक गडचिरोली - मानपूर - भानूप्रतापपूर - नारायणपूर; दुसरा मार्ग नागपूर -भंडारा-देवरी -राजनांदगाव-अंतागढ -नारायणपूर. पूर्ण चौकशीनंतर आम्ही राजनांदगाव मार्ग निश्चित केला. गडचिरोली मानपूर पावसाळ्यात खूपच खराब झाल्याचे कळले होते.आमच्या टीम मध्ये गोसेखुर्द धरण विस्थापितांसाठी संघर्षरत कार्यकर्ते विलास भोंगाडे, मी,जननी श्रीधर, समीक्षा गणवीर, हिंगणघाटचे पुंडलिक तिजारे,मारेगाव तालुक्यातील सावंगी येथील सरपंच अभिजीत मांडेकर हे होते.आमच्यापैकी कोणीही यापूर्वी बस्तर मध्ये गेलेलो नाही.मोहीमे पूर्वी विलासने नारायणपूर येथे संपर्क करून ठेवला होता. बिलासपूर येथील कवी मित्र शाकिर अली यांचेकडून जगदलपूर येथील काही संपर्क क्रमांक घेऊन ठेवले.
८ऑगस्ट २०२१ ला नागपूरहून १२ वाजता आमचा जथ्या बाहेर पडला.नागपूर ते नारायणपूर हा प्रवास आठ तासाचा आहे.कोहमारा जवळ "बल ढाब्या"वर चहा नाश्ता करून राजनांदगांवचे दिशेने निघालो. देवरीचे पुढे भर्रेगाव जवळ आंतरराज्य चेकपोस्ट आहे.या चेकपोस्टनंतर छत्तीसगड राज्य सुरू होते.छत्तीसगड मधील दुस-या एका चेकपोस्टवर आमची कोरोना लसीकरण बाबत खात्री केल्या गेली. तेथून राजनांदगांव पर्यंतचा प्रवास राष्ट्रीय महामार्गावरूनच झाला.राजनांदगांव पासूनचा प्रवास अनोळखी. भानुप्रतापपूर,दल्ली राजहरा, अंतागढ असा प्रवास.दल्ली राजहरा येथे पाच वाजता पोहचलो. एकदा पुन्हा चहा नाश्ता करून पुढचा प्रवास. दल्ली राजहरा येथूनच भीलाई स्टील प्लांटसाठी कच्चे लोह खनिज जाते.तसेच प्रसिध्द मजूर नेते, छत्तीसगड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शंकर गुहा नियोगी यांची कर्मभूमी.दल्ली राजहरावरुन पुढे काही अंतरावर रावघाट 'माईन्स'कडे जाणारा रेल्वे मार्ग दिसला.जो अद्याप पूर्ण झाला नाही. हा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी तीन लाखाझाडांची कत्तल करावी लागणार असल्याचे कळते.तसेच रावघाट 'माईन्स'ला अनेकांचा विरोध ही असल्याचे वाचण्यात आले आहे.दल्लीराजहरा येथील लोह साठा काही वर्षांतच संपणार असल्याने रावघाट माईन्स जी गरजही वर्तवण्यात येते.घनदाट जंगलातून प्रवास सुरू होता.अंधार पडू लागला. अंतागढ ते नारायणपूर हा प्रवासात एकही वाहन रस्त्यावर दिसले नाही.एकेरी रस्ता. किर्र दाट जंगल अन फक्त गाडीचा लख्ख प्रकाश व आवाज.मात्र दर आठ दहा कि.मी.वर पोलीस/पॅरामिलीटरी च्या चौक्या तैनात होत्या. रात्री आठ वाजता नारायणपूर ला पोहचलो.
९ऑगस्ट.जागतिक आदिवासी दिवस. जिल्हा परिषद अध्यक्षांचे निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या शासकीय मैदानावर कार्यक्रमाची तयारी सुरु होती. आम्ही सर्व तयार होवून जवळच्याच छोट्या हाॅटेल मध्ये नाश्ता करीता गेलो. हाॅटेल चे नाव होते "थ्री स्टार हॉटेल" आणि वर चिन्ह होती ओम, चांद- 786 व क्राॅस.हाॅटेल मालकाच्या बुद्धिमत्तेला दाद दिलीच पाहिजे.परत निवासस्थानवर. ठरल्या प्रमाणे अजय देवांगण आले.त्यानी आम्हाला नारायणपूर पासून वीस पंचवीस कि.मी.असलेल्या हलामी-मुंजटोला येथे सोडले. व ते परत गेले. हलामी-मुंजटोला हे शंभर टक्के आदिवासी गाव. गावालगतच्या शाळेलगतच्या मैदानावर कार्यक्रमाची तयारी सुरु होती.स्टेजवर बॅनर लागला होता.बॅनर वर "करंगाल परगना " लिहीले होते. लोक जथ्याने येत होते. लोकांना बसण्याची छान व्यवस्था होती. स्पिकर वर आदिवासी लोकगीत वाजत होती. स्टेज समोर आदिवासी ध्वज फडकवण्यासाठी स्तंभ उभा होता. त्याच्या चबुत-याभोवती रांगोळीने माझे लक्ष वेधून घेतले.त्यावर लिहिले होते "जय बुढादेव " ,"जय सेवा " ,"विश्व आदिवासी दिवसा" आणि विशेष लक्षवेधक म्हणजे "जय भीम " सुध्दा लिहिले होते.स्टेजवरही आदिवासीच्या बुढादेव सोबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ही ठेवला होता. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र सर्वहारा वर्गासाठी चे तत्वविचार पटू लागले.आज पासून तीस चाळीस वर्षापूर्वी आदिवासीच्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो दिसत नव्हते.हा लक्षणीय बदल झाला आहे.अगदी भामरागड सारख्या अतिदुर्गम खेड्यात सुध्दा हे अनुभवले आहे.आदिवासींच्या मेळाव्यात पुस्तकाची दुकानही अपवादानेच असायची. हलामी-मुजटोला सारख्या दुर्गम गावातील कार्यक्रमात पुस्तक विक्रेतेही होता. गोंडी ,आदिवासी साहित्य मोठ्याप्रमाणात होते.
येथील कार्यक्रमास वेळ असल्याने देवांगण नावाचे ग्राम सेवकाने अगदी दूरच्या छिनारी ग्राम पंचायत मुख्यालयात घेऊन गेला. मला तर एटापल्ली,भामरागड, धानोराचे जंगलात आलो असेच वाटले.आदपाल, छोटे फरसगाव व छिनारी या तीन गावाची ही ग्राम पंचायत.१३०० लोकसंख्या. छिनारीची लोकसंख्या ७५०.आंब्याच्या झाडाखाली स्पिकर लावून कार्यक्रम असल्याचे सांगण्यात येत होते.चिंचेच्या झाडाखाली सामुहिक भोजनाची तयारी सुरू होती. तिसरी कडे मुलं खेळत होती. कार्यक्रमाला नक्की कोण आणि काय प्रबोधन करणार माहीत नव्हत. पण आदिवासी दिवस साजरा करण्याचा उत्साह मात्र अवर्णनीय. कदाचित त्या छिनारीतील आदिवासींना माहितही नसेल कशा साठी आदिवासी दिवस साजरा करतोय. पण आपला काहीतरी उत्सव आहे एवढेच त्यांना ठावूक होते.चिंचेच्या झाडाखाली वांगे,आलू,कांदे कापणा-या तरूणी सोबत चर्चा केली. शिक्षण, आरोग्य, नोकरी, आर्थिक स्थिती,गावातील विकास यावर सहजच गप्पा केल्या. मॅट्रिक पर्यंत गेलेली एकच मुलगी होती. पुढे शिकण्याविषयी विचारल तर काही बोलली नाही.. खोदून विचारल. तर म्हणाली इच्छा नाही.परिस्थिती नाही.मी म्हणालो, सरकारी शाळा आहे,वसतिगृह आहे.आश्रमशाळा आहेत.पण कोणा कडूनही उत्तर आले नाही.ब-याच मुलींनी अर्ध्यावरच शाळा सोडल्याच दिसल. पाचवी, सहावी, सातवी मधूनच शाळा सोडल्याचे दिसतेय. गावात चवथी पर्यंत शाळा. मास्तर नियमित येत असेल का ! शंकाच आहे.सद्या कोरोनामुळे सर्व घरीच. शाळा बंदच. या शाळा बंद मुळे ग्रामीण भारतातील किती मुला मुलींच नुकसान झाल असेल! जंगल प्रदेशाबद्दल काय बोलायच !
तेथे उपस्थित काही तरुणांनी, ग्राम सेवकाने माहिती दिली की,कोणे एके काळी हे गाव नक्षलवाद्यांचे येण्या जाण्याचे ठिकाण होते. त्यांचे त्रासामुळे काही कुटूंब गाव सोडून गेल्याचेही सांगण्यात आले. आता गावाच्या जवळच पोलीस मदत केंद्र असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे नक्षलवाद्यांचा सद्या वावर कमी असल्याचे बोलले. खरे खोटे त्यांनाच माहित.पण गोची मात्र आदिवासींची.मुला मुलीवर सॅटेलाईट चॅनेल च्या भरजरी सिरियल्स चा पगडा दिसलाय.शिक्षणा विषयी उत्सुकता कमी दिसली.या छिनारी गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू दिसले. ग्रामसेवकाले सहज विचारले, "क्या इसका इस्तेमाल होगा!" "योजना है,आदेश है .बनाना पडेगाव.तुम्हारे महाराष्ट्र मे स्वच्छता का अच्छा हुआ सुना,पढा हू. " असे म्हणून ग्राम सेवक हसला. तेथून मुख्य रस्त्यावर आलो. तर मोटार सायकल वर झेंडे घेतलेले लोकांचे उत्साही जथ्ये नारायणपूर कडे रवाना होताना दिसले. जागतिक आदिवासी दिवसा विषयीची ही जागरुकता अचंबित करणारी होती.ही जागरुकता एका बुद्धिवादी, इहवादी,समतावादी चळवळी मत परिवर्तीत व्हावी.एवढीच अपेक्षा करु शकतो.
गोटूलपारा, कहडीगांव, दण्डवन,छिनारी,हलामी-मुंजटोला या गावांना भेटी देवून मुख्य कार्यक्रम असलेल्या नारायणपूर या जिल्हा मुख्यालयात आलो. येथील शासकीय पटांगणावर हजारो आदिवासी आपल्या पारंपारिक पोशाखात हजर होते. कार्यक्रम "सर्व आदिवासी समाज " या संघटनेने आयोजित केला होता. या संघटनेचे सचिव प्रताप मंडावी (छत्तीसगड मध्ये मडावी ला मंडावी म्हणतात) यांची आम्ही भेट घेतली. नागपूरहून आलो असल्याचे सांगीतल्यावर त्यांना फार आनंद झाला.आदराने विचारमंचावर बोलावून विलास आणि माझे स्वागत केले.जॅकी कश्यप, अनिमेश नेताम यांची भाषण सुरु होती. प्रताप मंडावी यांनी १९ मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले.आदिवासींच्या जल,जंगल, जमीन या सोबतच शिक्षण, आरोग्य, नोकरी,आर्थिक बाबींचाही त्यात उल्लेख होता. जॅकी कश्यप त्याच्या भाषणात म्हणाले, "नारायणपूर मे एक लाख लोग होंगे. 70-80 पर्सेंट आदिवासी है.फिर भी चंद मुठ्ठीभर लोग इस जिले मे राज करते है!" खरे तर ही समस्या आदिवासी बहूल भागात आहेच.आदिवासी नाममात्र नेतृत्व कोणी दुस-याचेच.ही वस्तुस्थिती आहे. जॅकी पुढे सांगतात, "शासन ने पुलीस वालोंसे व नक्षलवादीयोंसे भी चर्चा करनी चाहिए.क्यो आदिवासीयोकी प्रताडना कि जाती. नारायणपूर जिला स्तर पर आदिवासी स्त्रियोंपर अपमान जनक बर्ताव किया जाता है.पेसा/पांचवी अनुसूची की अमल हो " हे त्याचे म्हणणे देशभरातील आदिवासीचे प्रातिनिधिक मत आहे.आणि खरेही आहे.तत्कालीन आंध्र शासनाने नक्षलवाद्यांशी बोलणी केल्याचे आठवते. किती साध्यता झाली ही गोष्ट वेगळी.
या कार्यक्रमानंतर जेवण करुन जवळच असलेल्या परमहंस रामकृष्ण मिशन चे आश्रमाला भेट दिली. या आश्रमाचे बरेच प्रस्थ आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, क्रिडा यामध्ये काम करत आहे.अनेक आदिवासी मुल मुली येथे शिक्षण घेत आहेत. खेळाच भव्य आडोटोरीयम आहे.आदिवासी मुले मलखांब, बॅडमिंटन, टेनिस इत्यादी खेळताना दिसले. या आश्रमाच्या मुख्य मंदिरात गेलो. भव्य हाॅल, शांत. भरपूर खिडक्या. स्टेजवर परमहंस आणि मां शारदा यांच्या तसबिरी सोबत स्वामी विवेकानंद यांचीही मोठी तसबीर आहे.त्यासमोर दिवा तेवत आहे.पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटले.परमहंस आणि विवेकानंद यांचे मध्ये हनुमानाची तसबीर कशी व का ? हाॅलभर परमहंसाच्या गुरुशिष्य परंपरेचे फोटो लावण्यात आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष (येथे जिल्हा पंचायत असे संबोधतात) शामबती रजनू नेताम ह्या दिवसभर शासकीय कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची भेट सायंकाळी त्यांचे मूळ गावी ठरली. त्याप्रमाणे आम्हा सर्वांना अजय देवांगण घेवून गेले. त्यांचे पती रजनू नेताम हे नारायणपूर जिल्ह्यातील काँग्रेस चे वरीष्ठ नेते आहेत. स्वतः शामबती नेताम ह्या ग्राम पंचायत सदस्य, सरपंच, जि. प.सदस्य व आता जिल्ह्यातील.प.च्या अध्यक्ष असा त्यांचा राजकिय प्रवास आहे.त्यांचे घरी अगदी मनमोकळी चर्चा झाली. आमचे सोबत असलेल्या जननी, समीक्षा या महिलांनी महिला, आरोग्य, शिक्षण, बाल विकास इत्यादी मुद्यावर शामबती यांची भूमिका जाणून घेतली. आदिवासींचे प्रश्न, त्यांचा विकास, त्यांचे नेतृत्व, यावरही चर्चा झाली. रजनू नेताम कसलेले नेते दिसले. महाराष्ट्रातील काही आदिवासी नेत्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.शामबती आणि रजनू नेताम यांना शुभेच्छा देऊन आम्ही निरोप घेतला.
ही भेट संपवून अध्यक्षाचे स्वीय सहाय्यक अजय देवांगण यांनी आम्हास नारायणपूर दाखवले. छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर कांकेर, सुकमा, कोंडागाव दंतेवाडा, बिजापूर आणि नारायणपूर हे जिल्हे नव्याने झाले. नारायणपूर आपल्या गडचिरोलीसारख विकसित होणार गाव आहे. यांनी एका वस्ती कडे हात करुन दाखवत म्हणाले, "बस्तर के सरपंच और ग्रामसेवक यहा रहते है "
मी,"कितने और क्यो?"
"सर जी अपनी जान जोखीम मे कौन डालेगा ",देवांगण
मी,"फिर काम कैसे होते ग्रामपंचायत के !"
"जाते है महिने मे एखादबार ",देवांगण
मी आश्चर्यचकित होत विचार करीत राहीलो. गडचिरोलीत ही इतकी वर्षे काम केले. तेथेही न जाणारे ग्रामसेवक आहेत.पण एवढी भयानकता नाही.अस्वस्थता, दडपण, भय नक्की आहे. पण देवांगण म्हणाले तेवढी नक्कीच नाही. विचार आला, कसा होत असेल विकास त्या गावांचा; शासन निधी कसा खर्च होत असेल!.असेही वाटले हे खरे असेल का! पण स्थानिक माणूस आहे.खोट कस काय सांगणार.असेही वाटून गेले.
- प्रभू राजगडकर
9422191202
All Photo Credit @ Prabhu Rajgadkar
0 Comments